२८ जुलै, २०११

बालभारती

अतिशय उदासवाणी संध्याकाळ होती. साडे-आठ वाजून गेले होते तरी पण हा अग्निगोल बुडायचं नाव घेत नव्हता. नुसता जाळत होता विश्वाला. घरात बसून करमेना म्हणून मी खाली हिरवळीवर गेलो, कुठलेतरी विचार मनात घेऊन. हळूच वार्‍याची झुळूक आली आणि अख्खी हिरवळ सरसरली. उगाचच मला एक कविता आठवली. "गवतचा पातं वार्‍यावर डोलत, डोलतना म्हणत खेळायला चला." जरा मेंदूवर ताण दिल्यावर आठवलं, इयत्ता पहिलीमध्ये बालभारती मराठीच्या पुस्तकातली ही पहिलीवहिली कविता. आणि आश्चर्य म्हणजे पुढे बरीच आठवली मला ती कविता. काही २० वर्षांपूर्वी पाठ केलेली कविता अजूनही मला तोंडपाठ होती. नवलच!

मग त्याच विचारात पुढे बालभारतीची उजळणी कारायला लागलो. एकेक करत खूप कविता आठवल्या. लाल टांगा घेऊन येणारा लाला टांगेवला, मागोमाग टूणटूण धावत येणारा गोबरा कापूस पिंजून ठेवल्यासारखा दिसणारा ससा, एकीकडे शेपूट असलेल्या प्राण्यांची भरलेली जाहीर सभा वगैरे वगैरे. प्राथमिक शाळेमध्ये असतानाच्या कविता आता केवढ्या विनोदी वाटतात, पण तेव्हा त्या जाम आवडलेल्या असतात. त्यावर शाळेत स्नेहसंमेलनाला एखादा डान्स वगैरे पण केलेला असतो, मस्त नटून-थटून, गाल गुलाबी रंगवून. त्या कविता बहुधा फक्त नाचण्या-गाण्यासाठीच कोणीतरी लिहीलेल्या असाव्यात. बालकाव्यच ते. त्या वयात खर्‍या जगाचं भान आलेलं नसतं, बालकवींचा आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे हा अॅटीट्यूडच त्या वयात खूप आवडलेला असतो.

खोप्यामद्धे खोपा करणारी बहिणाबाईंची सुगरण, पहाट झाली तरी निजलेल्या चिउताईला हळुवारपणे उठवणारे कुसुमाग्रज, एका तळ्यातील सुरेख बादकांच्या पिलांमधील एकाच त्या वेड्या कुरूप पिल्लाची भावना मांडणारे माडगूळकर, पडक्या धर्मशाळेच्या कौलारीत बसून उदासपणे गाणारा पारवा, आपल्याला पक्ष्यांच्या माध्यमातून खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी शाळेत ते काहीच धड कळालेले नसते. सर्व कविता परीक्षांसाठी पाठ आणि त्याची उत्तरे नवनीतच्या गाईड मधून तयार केलेली असतात. पुढे आठवी नववी मध्ये तर कविता ह्या फक्त छंदवृत्त यांची उदाहरणे पेपर मध्ये लिहिण्याकरता असतात असाच काहीसा माझा समाज झाला होता.

बहिणाबाईंच्या जीवनाचा अर्थ सांगणार्‍या कविता, त्यातील एक निरागस खेडवळ भावना. अशुद्ध असूनही भावायचे ते मराठी आणि त्या कविता.  उन्हामध्ये धरण बांधणार्‍या बाईची कसरत. सागराला किनारा आहे म्हणून त्याला पामर ठरविणारा तो धैर्यवीर कोलंबस, पूर आल्याने संसार उध्वस्त झाला तरी एक पैशाचीही मदत न मागणारा पण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा असा म्हणणारा तो, अंगावर शहारा येतो त्याची व्यथा ऐकून आणि तरीही न मोडलेला कणा पाहून. नावीन्य गेल्यावर कडकपणा जाऊन मऊसर झालेली शांता शेळकेबाईंची पैठणी, या सर्व कवितांचा मातितार्थ कधी त्या वयात कळलाच नाही आणि कळला असेल तरी वरवरच.

प्रेमाचा गुलकंद ही विनोदी प्रेमकविता, पृथ्वीचे सूर्यावरील प्रेम अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्धं करणारी कुसुमाग्रजांची "पृथ्वीचे प्रेमगीत", भिल्लासारखं निधड्या छातीने प्रेम करण्याचे आवाहन करणारी कविता. ती आर्तता, ते प्रेम तेव्हा कधी हृदयापर्यंत भिडलं नाही पण आज ह्या कविता वाचताना त्याचे मोल कळतेय.

भले त्या वयात त्या कवितांचा अर्थ पूर्णपणे समजला नसेल तरी पण आज ह्या सर्व कविता वाचल्या की सगळ्या जुन्या आठवणी काही क्षणात डोळ्यासमोरून जातात. आज त्या खजिन्याची खरी किंमत कळते. आज जेव्हा त्यांचा अर्थ समजतो तेव्हा मी स्वत:ला भाग्यवान समजतो. धन्य ते बालभारती, धन्य ते कवी, धन्य ती मराठी!

येथे संग्रह बघा

१० जुलै, २०११

चेन्नई - एक खुसखुशीत अनुभव

"चेन्नई" भारतातले चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीची राजधानी आणि तमिळनाडू राज्याचीदेखील. BMW, Hyundai, Ford, Ashok Leyland, NOKIA आदि कंपन्या असलेले शहर. अश्या एक ना अनेक गोष्टी आहेत या शहराबद्दल सांगाण्यासारख्या पण त्या काय कोणीही सांगेल....
माझा आणि या चेन्नई शहराचा संबंध आला तो नोकरी मुळे. थोडक्यात सांगायचे तर मी 8 महीने accenture च्या चेन्नई ऑफिस मध्ये होतो. या शहरात कंपनी ने रवानगी केल्याचे ऐकूनच धडकी भरली. तशी भारतील IT शहरे म्हणजे बंगळूर, पुणे, हैदराबाद, कोलकाता,  मुंबई, थोड फार दिल्ली NCR वगैरे, पण ही सर्व सोडून चेन्नई का? या प्रश्नाचे उत्तर मिळता-मिळवताच जाण्याचं दिवस येऊन ठेपला आणि आयुष्यातला पहिला विमानप्रवास करत चेन्नईला पोचलोसुद्धा.
तसे विमानतळाबाहेर पडल्या-पडल्या झालेले चेन्नई चे प्रथमदर्शन काही फारसे सुखावह नव्हते. अण्णांची ही गर्दी, 'इकडे या, तिकडे घेऊन जातो, स्वस्तात नेतो' म्हणत रिक्शा / टॅक्सी वाल्यांनी लावलेला तगादा आणि तो ही अगम्य अश्या तमीळ-इंग्रजी भाषेत, मराठी तर सोडाच, हिंदीचाही मागमूस नसलेली तमीळ जनता, त्यांचे एकमेकांशी भांडणासारखे वाटणारे संवाद  आणि साथीला हवेतील प्रचंड आर्द्रता, उष्णता ... आणि समोर ठाकलेले एक अनोळखी शहर... चेन्नई.
 
एका टॅक्सीवल्याला पकडले (त्यानेच आम्हाला पकडले म्हणा ना).
सिद्धार्थ : "अण्णा, हॉटेल president, राधाकृष्ण सलै road".
त्यापुढे काही 400 Rs, 200 Rs अशी काही चर्चा आणि मग शेवटी एकमत झाले.
अण्णा : "चेरी चेरी!" ... "सीट, सीट"
मी : "चेरी? हा चेरी-चेरी का करतोए? चेरी हवी का ह्याला?"
सिद्धार्थ : "काय माहीत, मरु दे. आपल्याकडे तशीही नाहीये चेरी".
सिद्धार्थ तमीळ मध्ये संवाद साधून काम झाल्याच्या आनंदात होता. वास्तविक त्या वाक्यात "अण्णा" सोडून एकही तमीळ शब्दा नव्हता आणि सलै म्हणजे 'तमीळ रास्ता' हे आम्हाला तेव्हा माहीत नव्हते, ते त्याने पत्ता लिहीलेल्या कागदावरचे फक्त वाचून दाखविले होते. थोड्याच वेळात पुढे झालेल्या हिंदी-इंग्रजी-तमीळ मिश्रित अश्या  अनाकलनीय संवादातून एवढे कळाले की "चेरी" म्हणजे "OK किंवा हो". प्रत्येक होकारार्थी वाक्याचा होकार हा टॅक्सीवाला "चेरी" मागून द्यायचा. त्यावरून हा आम्ही लढवलेला तर्क जो नंतर बरोबर निघाला.
 
त्या क्षणी वाटलं, अरे बापरे, हे कुठे आलो आपण? यापेक्षा आपलं पुणे किती मस्त होतं. मी आणि सिद्धार्थ एकमेकांशी काहीच बोलण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो. कदाचित दोघेही ह्याच विचारात होतो की इथे राहायचे? किती दिवस? इथे कुठे? ह्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे तेव्हा नव्हती, दोघेही खिडकीतून बाहेर बघत होतो. मोठाले शहर, आपल्या पुण्यापेक्षा तर कितीतरी मोठे. अवाढव्य विस्तार जाणवत होता. प्रचंड रस्ते, रहदारी, ऊंची कार, टॅक्सी, बाजूला अखंड रस्ता आणि पूल यांच्याशी शिवणपाणीचा खेळ खेळणारा मेट्रोचा ट्रॅक. Infrastrucure म्हणाल तर अफलातून. कोणत्याही पुणेकरला ते भारीच वाटेल असे. एखाद्या भारतीय राज्याची राजधानी शोभावी असे शहर.
 
लगेच दुसर्‍या दिवशी दिनक्रम सुरू झाला. पंचतारांकित हॉटेल मध्ये induction, जेवण, desserts, थोडक्यात बड्या कंपनीचे बडे नखरे. दोन दिवस भारी मजेत गेले. मग सुरू झाले ते training, पाठोपाठ परीक्षा. आमच्या कॉलेजचा मास्तर म्हणायचा, "there is no free lunch in this world!" खरेच. एवढे चांगले शिक्षण घेऊन आल्यावरसुद्धा ह्या कंपन्या तेच परत शिकवणार आणि वर परीक्षा सुद्धा घेणार. चलायचेच! पण तरी, आपल्याला जे आधीपासून येतय तेच परत शिकण्याचे पैसे मिळतायत, ही कल्पना सकारात्मता देऊन गेली.
 
एक दिवस भन्नाट अनुभव आला. मी आणि सिद्धार्थ जेवायला जवळच गेलो होतो. सिद्धार्थला पायाला लागल्याने तो धड चालू शकत नव्हता. जेवण झाल्यावर बाहेर आलो तर पावसाला कोणीतरी पैसा दाखवून पडायला भाग पाडलेले होते. म्हणून रिक्षा पकडून जाऊ असा विचार करून एका अण्णाला पटवले. अण्णा दारूने ठार नशेत वाटत होता. थोडे पुढे गेल्यावरच हॉटेल आले. अण्णाला सांगितलं की थांब, पण हा बेवडा थांबायलाच तयार नाही. हिंदी, इंग्रजी काय, अगदी मराठी मध्ये सुद्धा ओरडून झाले पण काही फरक पडेना (तमीळ मध्ये ह्याला कसे ओरडावे हे आम्हांस ठाऊक नव्हते). पाठीवर दणके दिले तरी अण्णा चाललेच आहेत पुढे. शेवटी मी आणि सिद्धार्थ ने ठरवले की आता उडी मारायची. अण्णा रिक्षा रस्त्याच्या मध्यभागावरून चालवत होते. मी उडी मारली आणि एक क्षण माझ्या काळजाचा ठोका चुकला. सिद्धार्थ आतच होता आणि तो उडी मारणार तेवढ्यात रिक्षाच्या बाजूने भरधाव वेगाने बस गेली. मला काही कळेना. मी बाजूला येऊन  थांबलो. तेवढ्यात साहेबांनी हाक मारली, सिद्धार्थ माझ्या पुढे पळत होता आणि एव्हाना तो रिक्षावालाही आमच्या मागे लागला होता. कमालच केली! गिऱ्हाईक पळून गेलं आणि आता पैसे मिळणार नाहीत हे कळल्यावर उतरली अण्णाची दारू.
 
मजल-दरमजल करीत 2 महिन्यांचे training संपले आणि मॅनेजरची परवानगी काढून आम्ही परत सुट्टीला पुण्यात हजर. आणि मग पुढे ती हजेरी दरमहा लागू लागली. पुण्यात जास्तीत-जास्त वेळ काढायचा, चेन्नई किंवा प्रवासात नाही म्हणून कायम विमानप्रवासच केला. मजेची गोष्ट म्हणजे कोणत्याच प्रवासाची सुट्टी accenture च्या timesheet मध्ये भरली नाही आणि एकतर त्यात त्यांनाही काही वावगे वाटले नाही अथवा त्यांना कधी फरकही पडला नाही किंवा त्यांना ते कधी कळालेच नाही.
 
चेन्नईमध्ये आमचे एक अतिशय लाडके असे restaurant होते. "Farm house" नावाचे.  तिथे जयचा रस्ता सुरेख होता, restaurant चा ambience  खूपच सुंदर होता आणि महत्त्वाचे म्हणजे चेन्नई सारख्या शहरात पंजाबी खूप छान मिळणारे आम्हाला मिळालेले एकमेव ठिकाण. आम्ही आमच्यातले सगळ्यांचे वाढदिवस तिकडेच साजरे करायचो. शनिवार-रविवारी कंटाळा आला की ECR रस्त्यावर लांब फिरून यायचो, मरीना बीच, बेसंट नगर बीच, chennai citi center mall, multiplexes, mayajal, बरेच फिरलो. काही ठरावीक delicacies ही आम्ही शोधून काढल्या होत्या. Saravana Bhuvan ची थाळी, मुरूगन इडली शॉप चे पोंगल, अगस्ति नावाच्या restaurant मधील चिकन तंदूरी, नल्ला चे चिकन lolipop, punnusamy ची बिर्याणी यावर प्रत्येक वेळी गेलो की ताव मारायचो. चेन्नईहून पॉन्डीचेरीला पण जाऊन आलो. एकंदरीत,  खूप धमाल केली.
 
पुण्याचे सुख तर नाही ना, मग चेन्नई मध्ये जे आहे त्यात का enjoy नाही करायचे? तसं हे उमगायला बराच काळ गेला, पण ती एक भविष्यासाठी शिकवण होती. जे नाहीये त्यापाई रडण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घ्यावा आणि आज मी इथे अमेरिकेत त्याच विचारला धरून मजेत आहे. आयुष्यात प्रथमच घरच्यांपासून लांब राहायची वेळ आली होती. त्यात चेन्नई या शहराने मला बाहेरील जगाची जाणीव करून दिली. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर बाहेर कसे राहावे, लोकांना कसे ओळखावे, आपली आर्थिक घडी काशी सांभाळावी, कोणावर किती विश्वास ठेवावा, हे सर्व काही शिकवून गेलं हे शहर. काही चांगल्या, काही मजेच्या, काही वाईट अश्या सर्वच अनुभवांने समृद्ध असा माझा वास्तव होता. आजही आठवण आली की एकदा परत जावेसे वाटते.
 
नकळत आपण खूप काही शिकत असतो आणि आपण ते शिकलो आहे याची प्रचिती आपल्याला नंतर कधीतरी काही प्रसंग देऊन जातात आणि मग आपण कधीतरी विचारात पडतो, की 'हे मी असं वागलो ते कश्याने? कदाचित आयुष्यातल्या ह्या एका अनुभवामुळे किंवा ह्या एका घडलेल्या प्रसंगामुळे'. ते जेव्हा घडले तेव्हा ते सुखद नसतीलही, पण ते आज खूप काही देऊन गेले ... तसच चेन्नई हे शहर मला खूप काही देऊन, खूप काही शिकवून गेले.

४ मे, २०११

जावे त्यांच्या देशा !?!

परवाचीच गोष्ट. कॉलेज मधून घरी परत येत होतो. बरोबर मुंबईचे काही गुजराती, मराठी मित्र होते. बोलता बोलता विषय गेला पुणे आणि मुंबई दोन शहरांबद्दल. मुंबईकरांच्या मते पुणे हे एक  unadvanced शहर आहे, आणि का तर म्हणे कारण तिकडे मराठीत न बोलणार्‍यांना पेट्रोल पम्प वर पेट्रोल मिळत नाही, वडापाव च्या दुकानात पाव दिला जात नाही इत्यादि. (असे खरंच कुठे होत असेल तर मलाही सांगा.) उत्तर भारतीय पुण्यात आले की त्यांचे भाषेमुळे खूप हाल होतात म्हणे, त्यांची कामवाली बाई मराठी सोडून इतर कोणतीही भाषा बोलू शकत नाही वगैरे वगैरे.

मी सहज विचार करत होतो आणि मला असे जाणवले की जेव्हा मी चेन्नई मध्ये होतो तेव्हा मी तरी खूप प्रयत्न केला होता तामिळ शिकण्याचा, हॉटेल मध्ये गेलो की ऑर्डर देताना तामिळ मध्ये वाक्य सुरुवात करायचो, कधीकधी (प्रतिप्रश्न येईपर्यंत) पूर्ण ऑर्डर सुद्धा तामिळ मध्ये देऊ शकायचो. मग जर मी प्रयत्न करू शकलो, आणि नाईलाज म्हणून नाही तर एक साध तत्त्व म्हणून की "जावे त्यांच्या देशा" म्हणून. ह्याच पुण्यामध्ये मराठी चे आधुनिकीकरण झालेली पिढी सुद्धा वास्तव्य करून आहे.

माझा मुद्दा असा आहे की जर मी (त्याच पुण्यातला एक अस्सल पुणेकर) जेव्हा दुसर्‍या शहरात जातो आणि तिथले  रीतीरिवाज, भाषा, संस्कृती शिकण्याचा प्रयत्न करतो तर मग जेव्हा माझ्या शहरात इतर कोणी येतो तेव्हा त्याने थोडा तरी प्रयत्न का करू नये? वर ही तक्रार की "हमे पुणेमें बहुत ऐसा लगता है की ये शहर ने कभी हमे आपना बनया ही नही" कमाल आहे! जर तुम्ही स्वतः कधीच प्रयत्न केला नाहीत तर तुम्हाला कोण कशाला आपला म्हणेल? मग जर ही गोष्ट चेन्नई मध्ये गेल्यावर मला कळली तर ती ह्या महाभागांना का काळू नये?

माझा एक गुजराती मुंबईकर मित्र मला म्हणतो "तुझा दुसरा मित्र कायम सगळं मराठी मधेच का लिहीत असतो? वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये, ब्लॉग मराठी मध्ये, फेसबूक वरचे स्टेटस-अपडेट्स मराठी मध्ये, असे का? असे मला नही आवडत"! एक तर कोणत्या भाषेमध्ये काय करावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. आणि जर तो मराठी मध्ये करत असेल तर त्यात वावगे ते काय?

मराठीचेच कौतुक म्हणून नाही पण आपल्या मातृभाषेत बोलणे आणि आपल्या प्रांतात दुसर्‍याकडूनही त्या भाषेच्या वापराची अपेक्षा करणे यात काहीच चूक नाही आणि मागासलेपणा तर नाहीच नाही. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, कोणतीही द्वेषाची भावना नाही तर एक नैसर्गीक अपेक्षा आहे. 

पण आता ह्या अपेक्षा, त्यांच्या गुण-दुर्गुणांसह त्यांना समाविष्ट करून घेतलेल्या मुंबईकरांकडून करणं हीच कदाचित पुणेकराची चूक!!!

३० जुलै, २००८

Prathameek Prayatna ...

Mi maza blogspot warti blog kadhi kadhla malach nai athwat pan last post date tari distey ti tari Saturday, March 3, 2007 ashi date dakhwatya mhanje tya hi adhi kadhitari mi kadhla asawa. Pan kadhich kahihi suchla nai ki ya Blog war kay lihaycha asta? Anek lokance blogs pahile khare, waachle suddha, pan mhanoon aplya ayushtat ghadnarya kinwa aplyala anubhaw yenarya kontya gosthi ya Blog war takaychya astat he mala kadhich kalale nai bahudha. Mala tar mi swatah nehmich ek bhavya Thinktank watat aloe. Ahech. Pan mhanoon tyatlya kontya gosthinna Publish karaycha he nai kadhi kalala ... nahi kadhi wichaar kela.

Aajach Sudhanwa ne tyachya Blog chi link mala forward keli. Tyacha nawin Blog waachla and tharawla ki yess ... apanahi lihaycha. Kay te mahit nai pan khardaycha...

Thanks to Sudhanwa...

Tasa atta utsahat lihayla ghetlay pan kadhi parat lihe... i doubt!

Tari ... Ek prayatna...