परवाचीच गोष्ट. कॉलेज मधून घरी परत येत होतो. बरोबर मुंबईचे काही गुजराती, मराठी मित्र होते. बोलता बोलता विषय गेला पुणे आणि मुंबई दोन शहरांबद्दल. मुंबईकरांच्या मते पुणे हे एक unadvanced शहर आहे, आणि का तर म्हणे कारण तिकडे मराठीत न बोलणार्यांना पेट्रोल पम्प वर पेट्रोल मिळत नाही, वडापाव च्या दुकानात पाव दिला जात नाही इत्यादि. (असे खरंच कुठे होत असेल तर मलाही सांगा.) उत्तर भारतीय पुण्यात आले की त्यांचे भाषेमुळे खूप हाल होतात म्हणे, त्यांची कामवाली बाई मराठी सोडून इतर कोणतीही भाषा बोलू शकत नाही वगैरे वगैरे.
मी सहज विचार करत होतो आणि मला असे जाणवले की जेव्हा मी चेन्नई मध्ये होतो तेव्हा मी तरी खूप प्रयत्न केला होता तामिळ शिकण्याचा, हॉटेल मध्ये गेलो की ऑर्डर देताना तामिळ मध्ये वाक्य सुरुवात करायचो, कधीकधी (प्रतिप्रश्न येईपर्यंत) पूर्ण ऑर्डर सुद्धा तामिळ मध्ये देऊ शकायचो. मग जर मी प्रयत्न करू शकलो, आणि नाईलाज म्हणून नाही तर एक साध तत्त्व म्हणून की "जावे त्यांच्या देशा" म्हणून. ह्याच पुण्यामध्ये मराठी चे आधुनिकीकरण झालेली पिढी सुद्धा वास्तव्य करून आहे.
माझा मुद्दा असा आहे की जर मी (त्याच पुण्यातला एक अस्सल पुणेकर) जेव्हा दुसर्या शहरात जातो आणि तिथले रीतीरिवाज, भाषा, संस्कृती शिकण्याचा प्रयत्न करतो तर मग जेव्हा माझ्या शहरात इतर कोणी येतो तेव्हा त्याने थोडा तरी प्रयत्न का करू नये? वर ही तक्रार की "हमे पुणेमें बहुत ऐसा लगता है की ये शहर ने कभी हमे आपना बनया ही नही" कमाल आहे! जर तुम्ही स्वतः कधीच प्रयत्न केला नाहीत तर तुम्हाला कोण कशाला आपला म्हणेल? मग जर ही गोष्ट चेन्नई मध्ये गेल्यावर मला कळली तर ती ह्या महाभागांना का काळू नये?
माझा एक गुजराती मुंबईकर मित्र मला म्हणतो "तुझा दुसरा मित्र कायम सगळं मराठी मधेच का लिहीत असतो? वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये, ब्लॉग मराठी मध्ये, फेसबूक वरचे स्टेटस-अपडेट्स मराठी मध्ये, असे का? असे मला नही आवडत"! एक तर कोणत्या भाषेमध्ये काय करावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. आणि जर तो मराठी मध्ये करत असेल तर त्यात वावगे ते काय?
मराठीचेच कौतुक म्हणून नाही पण आपल्या मातृभाषेत बोलणे आणि आपल्या प्रांतात दुसर्याकडूनही त्या भाषेच्या वापराची अपेक्षा करणे यात काहीच चूक नाही आणि मागासलेपणा तर नाहीच नाही. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, कोणतीही द्वेषाची भावना नाही तर एक नैसर्गीक अपेक्षा आहे.
पण आता ह्या अपेक्षा, त्यांच्या गुण-दुर्गुणांसह त्यांना समाविष्ट करून घेतलेल्या मुंबईकरांकडून करणं हीच कदाचित पुणेकराची चूक!!!
1 टिप्पणी:
पूर्ण पणे पटतंय...
टिप्पणी पोस्ट करा