२८ जुलै, २०११

बालभारती

अतिशय उदासवाणी संध्याकाळ होती. साडे-आठ वाजून गेले होते तरी पण हा अग्निगोल बुडायचं नाव घेत नव्हता. नुसता जाळत होता विश्वाला. घरात बसून करमेना म्हणून मी खाली हिरवळीवर गेलो, कुठलेतरी विचार मनात घेऊन. हळूच वार्‍याची झुळूक आली आणि अख्खी हिरवळ सरसरली. उगाचच मला एक कविता आठवली. "गवतचा पातं वार्‍यावर डोलत, डोलतना म्हणत खेळायला चला." जरा मेंदूवर ताण दिल्यावर आठवलं, इयत्ता पहिलीमध्ये बालभारती मराठीच्या पुस्तकातली ही पहिलीवहिली कविता. आणि आश्चर्य म्हणजे पुढे बरीच आठवली मला ती कविता. काही २० वर्षांपूर्वी पाठ केलेली कविता अजूनही मला तोंडपाठ होती. नवलच!

मग त्याच विचारात पुढे बालभारतीची उजळणी कारायला लागलो. एकेक करत खूप कविता आठवल्या. लाल टांगा घेऊन येणारा लाला टांगेवला, मागोमाग टूणटूण धावत येणारा गोबरा कापूस पिंजून ठेवल्यासारखा दिसणारा ससा, एकीकडे शेपूट असलेल्या प्राण्यांची भरलेली जाहीर सभा वगैरे वगैरे. प्राथमिक शाळेमध्ये असतानाच्या कविता आता केवढ्या विनोदी वाटतात, पण तेव्हा त्या जाम आवडलेल्या असतात. त्यावर शाळेत स्नेहसंमेलनाला एखादा डान्स वगैरे पण केलेला असतो, मस्त नटून-थटून, गाल गुलाबी रंगवून. त्या कविता बहुधा फक्त नाचण्या-गाण्यासाठीच कोणीतरी लिहीलेल्या असाव्यात. बालकाव्यच ते. त्या वयात खर्‍या जगाचं भान आलेलं नसतं, बालकवींचा आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे हा अॅटीट्यूडच त्या वयात खूप आवडलेला असतो.

खोप्यामद्धे खोपा करणारी बहिणाबाईंची सुगरण, पहाट झाली तरी निजलेल्या चिउताईला हळुवारपणे उठवणारे कुसुमाग्रज, एका तळ्यातील सुरेख बादकांच्या पिलांमधील एकाच त्या वेड्या कुरूप पिल्लाची भावना मांडणारे माडगूळकर, पडक्या धर्मशाळेच्या कौलारीत बसून उदासपणे गाणारा पारवा, आपल्याला पक्ष्यांच्या माध्यमातून खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी शाळेत ते काहीच धड कळालेले नसते. सर्व कविता परीक्षांसाठी पाठ आणि त्याची उत्तरे नवनीतच्या गाईड मधून तयार केलेली असतात. पुढे आठवी नववी मध्ये तर कविता ह्या फक्त छंदवृत्त यांची उदाहरणे पेपर मध्ये लिहिण्याकरता असतात असाच काहीसा माझा समाज झाला होता.

बहिणाबाईंच्या जीवनाचा अर्थ सांगणार्‍या कविता, त्यातील एक निरागस खेडवळ भावना. अशुद्ध असूनही भावायचे ते मराठी आणि त्या कविता.  उन्हामध्ये धरण बांधणार्‍या बाईची कसरत. सागराला किनारा आहे म्हणून त्याला पामर ठरविणारा तो धैर्यवीर कोलंबस, पूर आल्याने संसार उध्वस्त झाला तरी एक पैशाचीही मदत न मागणारा पण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा असा म्हणणारा तो, अंगावर शहारा येतो त्याची व्यथा ऐकून आणि तरीही न मोडलेला कणा पाहून. नावीन्य गेल्यावर कडकपणा जाऊन मऊसर झालेली शांता शेळकेबाईंची पैठणी, या सर्व कवितांचा मातितार्थ कधी त्या वयात कळलाच नाही आणि कळला असेल तरी वरवरच.

प्रेमाचा गुलकंद ही विनोदी प्रेमकविता, पृथ्वीचे सूर्यावरील प्रेम अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्धं करणारी कुसुमाग्रजांची "पृथ्वीचे प्रेमगीत", भिल्लासारखं निधड्या छातीने प्रेम करण्याचे आवाहन करणारी कविता. ती आर्तता, ते प्रेम तेव्हा कधी हृदयापर्यंत भिडलं नाही पण आज ह्या कविता वाचताना त्याचे मोल कळतेय.

भले त्या वयात त्या कवितांचा अर्थ पूर्णपणे समजला नसेल तरी पण आज ह्या सर्व कविता वाचल्या की सगळ्या जुन्या आठवणी काही क्षणात डोळ्यासमोरून जातात. आज त्या खजिन्याची खरी किंमत कळते. आज जेव्हा त्यांचा अर्थ समजतो तेव्हा मी स्वत:ला भाग्यवान समजतो. धन्य ते बालभारती, धन्य ते कवी, धन्य ती मराठी!

येथे संग्रह बघा

५ टिप्पण्या:

Sameer Kulkarni म्हणाले...

Mast ekdam....

M Kale म्हणाले...

झकास.... शाळा संपली की कळतंय की त्या कविता किती भारी होत्या. तेव्हा की फकटा परीक्षेपूर्ती केलेल्या होत्या आणि तेंव्हा कोणी सांगितलं असतं तर आपला ते वय नव्हतं की त्या कवितांचा खर्‍या अर्थाने अर्थ समजून घ्यावा

ajit म्हणाले...

ek number re..

Unknown म्हणाले...

धन्यवाद मित्रहो!

Rohan Mehta म्हणाले...

आपल्याला कळायला लागलं तेव्हापासूनचा सुरु झालेला काव्य प्रवास ऐकता ऐकता पाठीला डोळे फुटले आणि टाईम मशीन लावून मन एक मुक्त सफर करून आलं. प्रवासात खूप मजा आली. धन्यवाद!